नगरमध्ये एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; लालपरीचा चक्काचूर, पत्राही बाहेर आला, अनेक प्रवासी जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
अहिल्यानगर – नगर-मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, तसंच एसटी बसचंही मोठं नुकसान झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारामध्ये हा अपघात झाला आहे. एसटी बस शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती, तेव्हाच कंटेनर आणि बसची धडक झाली. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना एसजेएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक प्रवाशांच्या मदतीला धावले आणि त्यांना गाडीमधून सुखरूप बाहेर काढलं, तसंच जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं.
कंटेनर आणि बसच्या या अपघातात एसटी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेला असलेल्या भागाचा चक्काचूर झाला आहे, तसंच बसचा पत्राही बाहेर आला आहे, यावरून हा अपघात किती भीषण होता, हे दिसत आहे. कंटेनर आणि बसच्या अपघातामध्ये नेमकी चूक कुणाची आहे? दोन्ही ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होते का? का या अपघाताचं आणखी वेगळं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.