हनिमूनला फिरण्यावरून वाद बेतला जीवावर ; सासऱ्याचा जावयावर थेट ॲसिड हल्ला

Spread the love

हनिमूनला फिरण्यावरून वाद बेतला जीवावर ; सासऱ्याचा जावयावर थेट ॲसिड हल्ला

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी, निवांत वेळ घालवण्यासाठी , फिरण्यासाठी बहुतांश जोडपी ही फिरायला, हनीमूनला जात असतात. दोघांच्या आवडीने कुठे जायचं हे ठरवतात. हनीमूनसाठी कुठे जायचं हा खरंतर पूर्णपणे त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण काही वेळी घरचे त्यांच्या नात्यात नको तितकी दखल देतात आणि वादाला सुरूवात होते. समजूतदारपणे बोलणी केल्यास वाद मिटू शकतो अन्यथा उगाचच काडी पेटून भडका उडू शकतो. असंच काहीसं कल्याणमध्ये घडलं, शुल्लक कारणावरून सासरा आणि जावयामध्ये वाद झाला, मात्र तो एवढा गंभीर होता की सासऱ्याने आपल्याच मुलीच्या नवऱ्यावर थेट ॲसिड हल्ला केला. कल्याण पश्चिमेकडे घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जावई ईबाद फालके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हे आरोपी सासऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ हद्दीतील आग्रा रोड आशा टॉवर्स परिसरात कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याने आपल्या जावयावर ॲसिड हल्ला केला. ईबाद फालके असे जखमी इसमाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईबाद याच्यावर जकी खोचाल यांनी ॲसिड हल्ला केला. हनीमूनला जाण्याच्या मुद्यावरून हा वाद पेटला. जकी यांच्या मुलीचा ईबादशी विवाह झाला. मात्र त्या दोघांनी हनीमूनला जाण्यापूर्वी मक्का-मदिनेला जावे अशी जकी यांची इच्छा होती, त्यांनी ती मागणीही केली. मात्र आम्ही काश्मीरला फिरायला जाणार असल्याचे ईबादने स्पष्ट केलं. त्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाने तीव्र स्वरूप घेतले आणि जकी खोटालने ईबाद फालकेवर ॲसिड फेकले. या हल्ल्यात ईबाद गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेनंतर आरोपी सासरा जकी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून कौटुंबिक वादाचे भयावह परिणाम उघड झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon