सोमैया ग्राउंडजवळील जमिनीवर बेकायदेशीर कब्जा व अवैध बांधकाम
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ, सोमैया ग्राउंडच्या समोर, भारतीय कमला नगर न्यू वेल्फेअर सोसायटीमध्ये बेकायदेशीर जमिनीवर कब्जा आणि परवानगीशिवाय बांधकामाचा प्रकार उघड झाला आहे. ही जमीन मुंबई महानगरपालिकेची असून, गेल्या अनेक वर्षांपासून नायर नावाच्या महिलेने या जमिनीवर कब्जा केला असल्याचे समोर आले आहे. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, नायरने मुंबई महानगरपालिकेच्या काही दलाल आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट सर्व्हेची कागदपत्रं तयार करून या जमिनीवर छोट्या-छोट्या खोल्या बांधून त्या लाखो रुपयांना विकल्या आहेत. काही ठिकाणी एका खोलीचे तीन भाग करून स्वतंत्रपणे विकल्या आहेत. हळूहळू या बेकायदेशीर कृत्याचा विस्तार होत गेला आणि आता या जमिनीवर ट्रान्सपोर्ट, दुकाने आणि ट्रॅव्हल एजन्सी बेकायदेशीरपणे चालवली जात आहेत.
अलीकडेच, नायरने पुन्हा महानगरपालिकेच्या जमिनीवर २००० चौरस फूटाचे दोन मजली बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचे सांगितले जात आहे. हे बांधकाम प्लास्टिकच्या पत्र्याने झाकले गेले आहे. एवढेच नव्हे तर, बनावट कागदपत्रांच्या आधारे बेस्ट कडून या बेकायदेशीर बांधकामाला विजेच्या मीटरची जोडणी देखील करून घेतली आहे. सध्या नायर शिवाजी पार्क, दादर येथे एका आलिशान इमारतीत राहतात. त्यांच्याबद्धल असे सांगितले जाते की, त्यांना पूर्वी एका दिवंगत काँग्रेस नेत्याचा राजकीय पाठिंबा मिळत होता. नायर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांनी अनेक वेळा फोन केल्यानंतरही कोणताही प्रतिसाद दिला नाही. एका पत्रकार आणि स्थानिक रहिवाशांनी ही माहिती महानगरपालिकेच्या एफ-नॉर्थ वॉर्ड अधिकाऱ्यांना दिली असून या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. आता महानगरपालिका प्रशासन या प्रकरणावर कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.