अंबरनाथमध्ये पार्टीच्या वादातून तरूणाला भोसकलं; एकाच्या गुप्तांगावर वार तर दुसऱ्याच्या डोक्यात, आरोपी अटकेत

Spread the love

अंबरनाथमध्ये पार्टीच्या वादातून तरूणाला भोसकलं; एकाच्या गुप्तांगावर वार तर दुसऱ्याच्या डोक्यात, आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ – अंबरनाथ हे गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चालले असल्याचे दिसून येत आहे. मुलींवर बलात्कार, अत्याचार तर सातत्याने होत आहेत. सरकार नावाची यंत्रणा व पोलिसांची दहशत कुचकामी ठरत असल्याची नागरिकांकडून कुजबुज सुरू आहे. एका शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरूणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड दहशत माजली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत गुन्हेगाराला बेड्या ठोकत गजाआड केलं. तुषार देडे असे मृत तरूणाचे नाव असून समीर वाघे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात तुषार ( वय १८) हा त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. मात्र त्यावेळी तेथे आरोपी समीर वाघे आला आणि त्याचे शुल्लक कारणावरून तुषारशी वाद झाला. पाहता पाहता त्यांचा वाद वाढला आणि रागाच्या भरात समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या वारात जखमी झालेल्या तुषार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रं वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील, विकास वळवी, चौधरी, बोरसे, खामकर, पोलीस नाईक देवरे, किनारे, पोलीस शिपाई राजगे, मुठे, काकडे, चत्तर, बोडके, गायकवाड आणि दादा वाघमारे यांच्या पथकाने या आरोपीला शोधून काढलं. समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात हत्येच्या ३ घटना घडल्या असून त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon