नारायणगाव पोलिसांची मोठी कारवाई; दानपेट्या फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या, ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नारायणगाव पोलिसांची मोठी कारवाई; दानपेट्या फोडणाऱ्याला ठोकल्या बेड्या, ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

नारायणगाव – नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. संदीप उर्फ भावड्या वाल्मीक पथवे – ३० याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २१ नोव्हेंबर रोजी शिरोली तर्फे आळे गावातील मळगंगा मातेचे मंदिर येथून दानपेटी फोडून त्यातील अंदाजे १ हजाराची रक्कम चोरून नेल्याची फिर्याद दत्तात्रय बबन डावखर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून नारायणगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिर चोरी तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

अशा गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपभोगीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, जगदेव पाटील, पोलीस हवालदार संतोष कोकणे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे, सत्यम केळकर, गोरक्ष हासे, सुभाष थोरात, सोमनाथ डोके, बनकर, टीलेश जाधव या पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी संदीप उर्फ भावड्या वाल्मीक पथवे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले १ हजार रुपये रोख रक्कम तसेच ८६ हजार रुपये किमतीच्या ४ मोटरसायकल हस्तगत केल्या. नारायणगाव पोलीस स्टेशन, आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हे उघडकिस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कोकणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon