ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीची तोडफोड, दगड भिरकावून फोडल्या काचा
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर – राज्यभरात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काल दिवसभर राज्यभरात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरु होती. दरम्यान, संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक २६८ मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. जेव्हा किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 वरून ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळेस परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिसांना बोलावलं.
दरम्यान, तोडफोड करण्यात आलेली तवेरा गाडी पोलिसांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणली असून ईव्हीएम आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या या गाडीची तोडफोड केली आहे, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.