पुण्यात वाहतूकच्या सहाय्यक फौजदारासह वॉर्डनवर गुन्हा दाखल, मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच

Spread the love

पुण्यात वाहतूकच्या सहाय्यक फौजदारासह वॉर्डनवर गुन्हा दाखल, मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – वाहतूक समस्येसोबत पार्किंगची देखील बिकट अवस्था अनेक शहरात चालू आहे. नागरिकांपेक्षा वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंग उपलब्ध होत नाही. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. नो पार्किंगमध्ये मोटारीच्या चाकाला लावलेला जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या वाहतूक शाखेतील वॉर्डनसह  फौजदाराविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही समर्थ वाहतूक विभागात कार्यरत आहेत.

सहाय्यक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१), ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका मोटरचालकाने फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्‍या एका रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदाराने त्यांची मोटार लावली होती. त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या मोटारीला जॅमर लावला. जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील ट्रफिक वॉर्डन (वाहतूक मदतनीस) अनिस आगा याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली. त्यामध्ये वॉर्डन अनिस याने एक हजारांची लाच मागून तडजोडीत सातशे रूपये स्विकारण्याचे मान्य केले.  अनिस हा कार्यालयात उपस्थित नसताना तक्रारदार समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी सहायक फौजदार रोटे यांनी अनिसने मागितलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानूसार एसीबीने  वॉर्डन अनिस आणि सहायक फौजदार रोटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon