महादेव बेटिंग ॲपशी संबंधित फेअर प्ले ॲप प्रकरणात ईडीकडून मुंबई, गुजरातमध्ये आठ ठिकाणी छापे, चार कोटींची मालमत्ता जप्त
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व गुजरातमधील आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत रोख रक्कम, बँकेतील पैसे व चांदी अशी चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत ११७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हलक्क भंग केल्याप्रकरणी २०२३ मध्ये फेअरप्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी मुंबईसह गुजरातमधील कच्छ येथे छापे मारण्यात आले आहेत. यापूर्वी याप्रकरणी तक्रारदार ‘वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या ॲपसाठी ४० कलाकारांनी जाहिरात केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने ऑक्टोबर, २०२३ मध्ये रॅपर बादशाहची चौकशी केली होती. या संपूर्ण गैरव्यवहारामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
फेअर प्ले ॲप महादेव ॲपशी संबंधित बेटिंग ॲप असून महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळ्यासाठी महादेव प्रवर्तकांनी सुमारे २०० कोटी रुपये रोख खर्च केले होते. दुबईमध्ये झालेल्या या विवाह सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्याने तेथे सादरीकरण केले होते. महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरला युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे अटक करण्यात आली. सध्या तो स्थानिक यंत्रणांच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षभरापासून चंद्राकरच्या अटकेसाठी ईडी प्रयत्न करीत होती. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने युएई प्राधिकरणासोबत चर्चा सुरू होती. आता चंद्राकरच्या प्रत्यर्पणासाठी ईडी प्रयत्न करीत आहे.
यापूर्वीच महादेव ॲपचा आणखी एक प्रवर्तक रवी उप्पल यांना यूएई अधिकाऱ्यांनी इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्याच्या प्रत्यार्पणासाठी सक्षम अधिकाऱ्यामार्फत विनंती पाठवली आहे. उप्पल आणि चंद्राकर यांनी त्यांचे भारतीय पारपत्र रद्द केले असून सध्या ते वानुआटु देशाचे नागरिक आहेत.