हरिहरेश्वरमध्ये पुण्यातील पर्यटकाने महिलेला चिरडलं, मृत पुण्यातील नगरसेवकांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती
योगेश पांडे/वार्ताहर
श्रीवर्धन – हरिहरेश्वर येथे आलेल्या मद्यधुंद पर्यटकाने महिलेला गाडीखाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मद्यधुंद पर्यटकाने महिलेला गाडीखाली चिरडलं आणि पलायन केलं. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथून हा प्रकार समोर आला आहे. निवासासाठी रूम न दिल्याने महिला आणि पर्यटकामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या क्षुल्लक वादातून पर्यटकाने महिलेच्या अंगावर गाडी घातली. यात तिचा मृत्यू झाला. हा पर्यटक पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील असल्याचं समजते. पर्यटकांमध्ये पुण्यातील नगरसेवकांचा मुलगा असल्याचे प्राथमिक माहिती आहे. स्कार्पिओमधून आलेले काही पर्यटक ममता होम स्टेचे श्री अभि धामणस्कर यांच्या मालकीच्या लॉजमध्ये रूम मागायला गेले होते. अतिशय मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने धामणस्कर यांनी त्यांना रूम देण्यास नकार देऊन कृपया दुसऱ्या ठिकाणी जा अशी विनंती केली. तेव्हा गाडीतील पर्यटकांनी श्री धामणस्कर यांना मारहाण केली.
बाहेर पळून जात असताना श्री धामणस्कर यांची बहिण ज्योती वय वर्ष ३४ हिला त्यांच्या स्कार्पियो गाडीने चिरडून ठार मारलं. आजूबाजूच्या परिसरातील लोक जागे झाल्यानंतर तेथील जागरूक नागरिकाने त्वरित दक्षता घेत त्यातील एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सर्व पर्यटक पुण्यातील असून पोलिसांनी तत्काळ बाहेर जाण्याच्या सर्व मार्गांवर नाकाबंदी केली. दरम्यान पर्यटकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.