१५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या धर्मादाय’च्या लिपिकासह एक ‘लाचलुचपत’ प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिक सध्या लाचखोरीत अव्वलस्थानी पुढे सरकत आहे. नाशकात मोठ्या प्रमाणात लाचखोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. नाशिक-पुणे रोडवरील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना दोघा लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मंगळवारी (ता. १) रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. धर्मादाय सहआयुक्तालयातील न्याय लिपिक सुमंत सुरेश पुराणिक (वय ४०, रा. श्री निधी बंगला, डीजीपीनगर- १, रेयॅान स्कूलजवळ, नाशिक-पुणे रोड), लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर (४७, रायगड चौक, सिडको) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदारांकडे नवीन दाखल फायलीच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणूक न करणे, निकाली फाइल नकला विभागाला विहित वेळेत पाठविणे, पुढील सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलदगतीने करून देण्याच्या मोबदल्यात लाचखोर पुराणिकने २३ सप्टेंबरला २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार लाच देण्याचे ठरले. यासाठी लाच मागणीस लघुलेखक बाविस्कर याने प्रोत्साहन दिले होते. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, शहानिशा करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (ता. १) द्वारका येथील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सापळा रचण्यात आला. शासकीय कार्यालयात पंच व साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कामगिरी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांच्या पथकाने केली.