नाशिकमधील जुन्या वादातून पाथर्डीत तरुणाचा खून; खुनाचं सत्र सुरूच
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिकमध्ये सध्या खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिक परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. अशीच एक घटना नवीन नाशिक परिसरात घडली आहे. जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना पाथर्डी गावात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत रामदास गांगुर्डे (रा. संघर्षनगर, विल्होळी, ता. जि. नाशिक) हे रिक्षाचालक आहेत. गांगुर्डे हे (दि. २२) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरी होते. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका मुलीने घरी येऊन सांगितले, की फिर्यादी गांगुर्डे यांचा लहान भाऊ अजय गांगुर्डे याने फोन लागत नसल्यामुळे माझ्याकडे फोन केला. त्यावेळी फिर्यादी यांचा भाचा नटेश विजय साळवे याचा अपघात झाला असल्याचे त्या मुलीने सांगितले. त्यानंतर फिर्यादीने लहान भाऊ अजय गांगुर्डे याच्या मोबाईलवर संपर्क साधून नेमका काय प्रकार आहे, याबाबत विचारणा केली.
नटेश विजय साळवे पाथर्डी गावातील काझी मंजिल इमारतीच्या समोर उभा होता. त्यावेळी आरोपी आयुष ऊर्फ यश दोंदे, प्रफुल्ल दोंदे, दुर्गेश शार्दूल, रोहित वाघ, गौरव शिंदे, करण बावळ व इतर साथीदारांनी संगनमत करून जुन्या वादाची कुरापत काढून वाद घातला. हा वाद वाढत गेल्याने सर्व आरोपींनी मिळून धारदार शस्त्राने वार करून नटेश साळवे याचा खून केला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात शशिकांत गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी आयुष ऊर्फ यश दोंदे, प्रफुल्ल दोंदे, दुर्गेश शार्दूल, रोहित वाघ, गौरव शिंदे, करण बावळ आणि इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.