नाशकात विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ‘रेक्टर’वर गुन्हा दाखल,
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महिला व मुलींवर अत्याचार, फसवणूक होत असून अशीच एक घटना घडली आहे. मूळ सटाणा तालुक्यातील रहिवासी असलेल्या अस्मिता संदीप पाटील (१७) हिने शुक्रवारी (दि.२०) सकाळी अमृतधाम येथील गीताई वसतिगृहात पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत स्वतःचे जीवन संपविले. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसतिगृहाच्या रेक्टर संशयित उमा पुष्कर हरक यांच्यासह के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज संस्था प्रशासनाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्मिताने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेनंतर मयत विद्यार्थिनीच्या संतप्त नातेवाइकांनी वसतिगृहात रोष व्यक्त केला. अस्मिता ही के. के. वाघ संस्थेच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे लावून धरली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर पोलिसांनी संशयित उमा पुष्कर हरक व के. के. वाघ कॉलेज प्रशासन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०७, ३(५) याप्रमाणे गुन्हा दाखल केला. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७४/२०२४). रात्री उशिरा नातेवाइकांनी तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला. शनिवारी बहुतांश पालकांनी त्यांच्या पाल्यांना सुट्टीमुळे मूळगावी घेऊन गेल्याने वसतिगृहात शांतता पसरलेली होती
प्रकरण नेमके काय आहे…?
तंत्रनिकेतन शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती गीताई वसतिगृहात निवासी होती. उमा हरक व संस्था प्रशासनाने अस्मिताला आत्महत्येस प्रवृत्त केले. घाईघाईने दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवून तिच्या खोलीतील पुरावे नष्ट केले. ती वसतिगृहात हजर असतानाही गैरहजर असल्याचे दाखविले. वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविणे आवश्यक होते, त्याकडे दुर्लक्ष केले.