भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा वाद झाला. काही समाजकंटकांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली. यावरुन दोन गट आमने-सामने आले. परिस्थिती तणावपूर्ण बनली. दगडफेकीच्या प्रकारानंतर गणेश मंडळाने आक्रमक भूमिका घेतली. दुसऱ्याबाजूचे लोक सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मंगळवारी भिवंडीत गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात सुरु होता. रात्री १२ च्या सुमारास घुघट नगर येथून विसर्जनासाठी बाप्पाची मुर्ती नदीनाका कामवारी नदीकडे घेऊन चालले होते. मिरवणूक वंजरपट्टी नाक्यावरुन जात होती. त्याचवेळी दुसऱ्या गटाबरोबर शाब्दीक बाचाबाची, वादावादी झाली. दुसऱ्याबाजूच्या काही मुलांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घातला. संतप्त जमावाने दुसऱ्या गटाच्या एका युवकाला पकडलं. त्याला भरपूर मारलं. तिथे आलेल्या पोलिसांनी जमावापासून युवकाची सुटका केली.
घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस पोहोचले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. घटनेबद्दल कळताच काही अन्य मंडळाचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. दुसऱ्याबाजूचा जमाव सुद्धा जमू लागला. पाहता-पाहता दोन्ही बाजूचे लोक जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती बिघडू लागताच डीसीपी, एसीपीसह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी जमावाची समजून काढण्याचा प्रयत्न करत होते. दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या अटकेच्या मागणीवरुन जमाव आक्रमक झाला. त्यांनी गणपति विसर्जन करण्यास नकार दिला. या दरम्यान पोलीस आणि विरोध करणाऱ्या जमावामध्ये धक्का-बुक्की सुरु झाली. परिस्थिती हाताबाहेर जातेय असं दिसताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. घटनेची माहिती मिळताच भाजपा आमदार महेश चौघुले समर्थकांसह तिथे पोहोचले. आरोपींविरोधात कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.