गणेशोत्सव येताच सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; लेडी सिंघम तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असतानाच राज्याच्या गृह विभागाने मुंबई आणि पुण्यासाठी काही महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई आणि पुणे शहरात गणेशोत्सावाची मोठी धूम असते. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. तर, पुण्यातही मानाच्या गणपतींच्या दर्शनाला भक्तांची रांग लागते. त्यातच, गेल्या काही दिवसांत पुण्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केला आहेत. त्यात, सिंघम महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांना पुण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने ६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्याती आली आहे. सध्या त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता. यांसह, संदीप सिंह गिल्ल, पंकज देशमुख, राजतिलक रोशन,निमित्त गोयल आणि विजय चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार आहे. तर, पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरुन मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी गृह विभागाकडून हा बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे.
अधिकऱ्यांची नावे आणि बदलीचे पदस्थापन अशा प्रकारे आहे १) संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण),२) पंकज देशमूख पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई,३) तेजस्वी सातपुते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर,४) राजतिलक रोशन सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई, ५) निमित गोयल,पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई आणि ६) विजय चव्हाण प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,सोलापूर.
राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील १७ पोलीस अधीक्षकांच्या गेल्याच महिन्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे वृत्त होते. त्यामध्ये, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि ठाणे येथील पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची देखील बदली करण्यात आली होती. समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली होती. तर, सुधाकर पठारे हे सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक झाले असते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या दोघांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन तात्काळ सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर आणि समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असं कळवण्यात आलं आहे.