धक्कादायक! पुन्हा बदलापूर, पित्याचा मुलीवर अत्याचार; बदलापूर पूर्व पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, नराधम बापाला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर – बदलापुरातील दोन चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं. लहानग्या वयात झालेल्या या अत्याचाराच्या घटनाने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडींला चालताही येत नव्हतं. ती शाळेत जाण्यास तयार नव्हती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली. या प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळेलही मात्र तिच्या मनावरील आघात पुसणं कठीण आहे. चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे बदलापुरात संतापाचं वातावरण असतानाच आता बदलापूरमध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब उत्तर प्रदेशमधील असून गेल्या काही वर्षांपासून बदलापुरात वास्तव्याला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.