ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड, मराठी कलासृष्टीवर शोककळा

Spread the love

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड, मराठी कलासृष्टीवर शोककळा

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या सिनेमातही दिसल्या होत्या. आता त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना आहे.

सुनासिनी देशपांडे मनाचा कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ…! (२००६), चिरंजीव (२०१६), धोंडी (२०१७) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे सिंघम या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं नाटकांमधूनही त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने २०१५ साली सन्मानित करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, ‘ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. त्यांनी वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी देवकीनंदन गोपाला , वारसा लक्ष्मीचा , काळूबाईच्या नावानं चांगभलं , पुढचं पाऊल आदी काही चित्रपटांत तर ‘तुझं आहे तुझ्यापाशी’ , ‘कथा अकलेच्या कांद्याची’, लग्नाची बेडी आदी अनेक नाटकांसह काही वगनाट्यांमध्ये काम केले. त्यांच्या निधनामुळे मराठी कलासृष्टीतील अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon