अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३५ वर्षाच्या नराधमाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३५ वर्षाच्या नराधमाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे/वार्ताहर 

अंबरनाथ – गेल्या महिनाभराच्या कालावधीत अल्पवयीन मुलगी घरासमोरील सार्वजनिक शौचालयात नैसर्गिक विधीसाठी आली की तिच्याशी जवळीक साधून, तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग करणाऱ्या एका ३५ वर्षाच्या नराधमाविरुद्ध पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर शाळेच्या घटनेवरून धडा घेतलेल्या पोलिसांनी पीडित मुलीची आई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येताच पोलिसांनी तात्काळ नराधामाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संतोष आनंद कांबळे – ३५ असे आरोपीचे नाव आहे. तो नोकरी करतो. तो अंबरनाथ पश्चिमेतील शिवसेना शाखेजवळील भास्कर नगर भागात राहतो. जुलै ते ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीत आरोपी संतोष कांबळे पीडित मुलीबरोबर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करत होता. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले की आरोपी संतोष कांबळे हा अंबरनाथ पश्चिमेतील भास्कर काॅलनीत राहतो. या वसाहतीसाठी संतोष कांबळे यांच्या घराच्या परिसरात अंबरनाथ पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. नैसर्गिक विधीसाठी नागरिक या शौचालयाचा वापर करतात. पीडित मुलगी सार्वजनिक स्वच्छता गृहात नैसर्गिक विधीसाठी आली की आरोपी संतोष तेथे यायचा. तेथे कोणी नाही पाहून तिच्याशी जवळीक साधून तिला स्वताच्या मोबाईलमधील अश्लील दृश्यचित्रफिती दाखवायचा. तेथे तिच्या बरोबर अश्लील चाळे करायचा. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिला फारशी जाण नाही हे माहिती असूनही संतोष तिच्याशी लगट करायचा. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी द्यायचा. या प्रकाराने अल्पवयीन मुलगी भीतीच्या सावटाखाली असायची.

गेल्या मंगळवारी दुपारी आरोपी संतोषने पीडित मुलगी स्वच्छतागृहात येताच तिच्या बरोबर नेहमीप्रमाणे अश्लील चाळे केले. संतोष कडूनचा त्रास वाढू लागल्याने पीडित मुलीने घडला प्रकार घरी कुटुंबीयांना सांगितला. हा प्रकार ऐकून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मागील महिनाभर संतोष हे गैरकृत्य करत असल्याचे पीडित मुलीच्या तक्रारीतून पुढे आले आहे. या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा नको म्हणून अंबरनाथ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलीस उपायुक्त डाॅ. सुधाकर पठारे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक मनीष वाघमारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon