पुण्यात ड्रग्ज सप्लाई सुरुच, कुरिअरच्या माध्यमातून ‘माल’ पोहोचवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्जची समस्या चिंतेचा विषय बनली आहे. पोलिसांकडून ड्रग्जची विक्री करणाऱ्यांवर आणि रेव्ह पार्टी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरी आता ड्रग्जच्या विक्रीसाठी नवनवे मार्ग वापरले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यक्ती कुरिअरच्या पार्सल्सचा वापर करुन ग्राहकांना ड्रग्ज पुरवत होता. पुणे शहर आणि शहराबाहेर हा व्यक्ती कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. विश्वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तब्बल १ कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी ड्रग्स विकत असताना एकूण तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी कुरिअरने ड्रग्स पाठवत असल्याची माहिती समोर आली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत विश्वनाथ कोनापूरे याला ताब्यात घेतले होते. त्याने आता नेमक्या कोणाला ड्रग्ज विकले होते, याची माहिती आता चौकशीतून समोर येईल. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणात आणखी कोणाला ताब्यात घेणार, हे पाहावे लागेल.