खुलताबादमध्ये बनावट गुटखा कारखान्यावर छापा; लाखो रुपयांचा ऐवज जप्त, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
खुलताबाद – तालुक्यातील खिर्डी येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस श्रीमती महल स्वामी यांनी छापा घालून २५ लाख २१ हजार ४२५ मुद्देमाल जप्त केला आहे. खुलताबाद तालुक्यातील झालेली ही अलीकडची सर्वांत मोठी कारवाई आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाकडून अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खुलताबादमध्ये अवैधरीत्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. खात्री करून पोलिस पथकाने बुधवारी खिर्डी येथील एका मंगल कार्यालयावर छापा मारला. त्या वेळी बनावट गुटख्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुगंधी सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक, दोन टेम्पो वाहन असा एकूण २५ लाख २१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आयपीएस अधिकारी श्रीमती महल स्वामी यांनी खिर्डी रोडवरील या मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास छापा टाकला. या बनावट गुटखा निर्मितीच्या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत साहित्य जमा करण्याची कारवाई सुरू होती. यामध्ये विविध तंबाखू गुटखा निर्मितीसाठी लागणारे साहित्य मशिनरी, एक ट्रक, दोन टेम्पो भरून सर्व माल खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद रफीक महंमद झकेरिया (५०), अनिसा बानो महंमद फरिद (४८), हुसेन महंमद सिद्दिकी झुडा (४९) आणि इरफान हारून तेली (४५) या चौघांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.