वाशीमच्या मानोरा येथील अनोळखी मृतदेहावरून अवघ्या २४ तासात दुहेरी खुनाच्या घटनेची उकल
पोलीस महानगर नेटवर्क
वाशीम – इंझोरी गावा जवळील अडान नदीच्या पात्रात अज्ञात पुरूष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत आढळुन आल्याने सर्व धर्म आपतकालीन पथकाच्या मदतीने स्थानिक पोलीस व प्रशासन यांनी घटनास्थळी जावुन अज्ञात व्यक्तीचे प्रेत पाण्याच्या बाहेर काढले. सदर प्रेताचे ग्रामिण रुग्णालय, मानोरा येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदर अज्ञात इसमाचा मृत्यु हा नैसर्गिक नसुन खुन असल्याने मानोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा नोदविण्यात आला. यातील मृतक हा अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविणे व खुनाचे कारण आणि अज्ञात आरोपी निष्पन्न करणे हे पोलीसांपुढे आव्हान मोठे होते. सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, पोलीस उपअधीक्षक प्रदिप पाडवी, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी मानोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली असता गुन्हयाची उकल करण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली. तपासादरम्यान दि. ०७/०८/२०२४ रोजी सदर अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात आली व मृतकाचे नाव प्रल्हाद दत्तराम विर, वय ७५ वर्षे रा. मंगरूळपीर रोड, सोमठाणा, मानोरा असे निष्पन्न झाले.
पथकांच्या अथक परिश्रमानंतर तपासदरम्यान गुन्हयातील आरोपी प्रतिक संतोष विर वय २३ वर्षे, रा. मंगरूळपीर असल्याचे निष्पन झाले. त्यास ताब्यात घेउन केलेल्या तपासदरम्यान गुन्हयात इतर तीन आरोपी जिवन भगवान फाळके वय २७ वर्षे, रा विठोली, जगदीस अनिल देवकर वय २४ वर्षे, रा. शिवाजी नगर धामणी व विकास संतोष भगत वय २५ वर्षे, रा. डोंगरगाव यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडे प्राथमिक तपासदरम्यान असे निष्पन्न झाले की मुख्य आरोपी प्रतिक संतोष विर याने त्याचे साथीदारंसह दिनांक ०४/०८/२०२४ रोजी सायंकाळी मृतक यांच्या राहत्या घरी जाऊन मालमत्ता व आर्थिक विषयावरून वाद उकरून काढून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला तसेच आरोपीची आजी निर्मला प्रल्हाद विर या वाचवण्यासाठी मध्ये आल्या असता त्यांचाही खून करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात प्रल्हाद दत्तराम विर, वय ७५ वर्षे व निर्मला प्रल्हाद विर दोन्ही रा. मंगरूळपीर रोड, सोमठाणा, मानोरा यांचा मृत्यु झाला. त्यानंतर आरोपी यांनी मृतकांच्या अंगावरील मौल्यवान दागिने व त्यांचे मोबाईल काढुन रात्री उशिरा दोन्ही मृतदेह मयताचे चारचाकी गाडीत टाकुन इंझोरी गावासमोरील अडान नदीपात्रात फेकुन दिले.
मिळालेल्या माहिती नुसार, वेगवेगळया पोलीस पथकांनी कसोशीने दुहेरी खुनाची घटना उघडकीस आणली तसेच स्थानिक नागरीक व आपतकालीन पथक यांच्या मदतीने दि ०८/०८/२०२४ रोजी निर्मला विर रा. सोमठाणा यांचा मृतदेह नदीपात्रातुन शोधुन काढण्यात यश प्राप्त झाले. सदरचा गुन्हयाचा घटनाकम पाहता नदीत सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवुन संशयीताचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन दुहेरी हत्याकांडाची अवघ्या २४ तासात उकल वाशिम जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, पोनि रामकृष्ण महल्ले यांचे मार्गदर्शनात मानोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि प्रविण शिदि करीत आहेत. सायबर सेल यांनी तांत्रिक बाबींचा तपास उत्तमरित्या केला. सदर गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा व स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथक सपोनि योगेश धोत्रे, सपोनि प्रदिप अलापुरकर, पोउपनि रामेश्वर नागरे, पोउपनि अभिजित वारे, पोलीस अमंलदार राहुल जयसिंगकार, मदन पुणेवार, सुभास महाजन, रविंद्र राजगुरे, दिलीस चव्हाण, दिपक राठोड, गजानन अवगळे, गजानन डागरे, राजु राठोड, गजानन गोटे, मयुरेश तिवारी, ज्ञानेश्वर राउत, आशिष एकाडे, मनिष अगलदरे, फिरोज खान, रोहन तायडे, अनिस निन्नसुरवाले. चालक विजय राठोड, करण चव्हाण, संदिप डाखोरे यांनी महत्वाची भुमिका पार पाडली व सदरच्या कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक वाशिम यांनी नमुद गुन्हांच्या तपासात अथक परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर बक्षिस जाहिर केले आहे.