बदलापुर एमआयडीसी रासायनिक कंपनीत स्फोट; रिएक्टरचा रिसिव्हर उडून चाळीवर कोसळल्यामुळे ३ जण जख्मी
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर – बदलापुरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की साधारण शंभर किलोचा रिएक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही. बदलापुरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं.सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कंपनीत रिएक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली.
हा स्फोट इतका भीषण होता की, रिएक्टरसोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एकाच कुटुंबातील एक पुरुष, एक महिला आणि लहान मुलगी असे तिघे जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलंय. तर एकावर बदलापुरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. साधारण शंभर किलो वजनाचा रिएक्टर घरावर कोसळला तेव्हा पहाटे ४.३० वाजले असतील. त्यावेळी या घरातील सर्वजण गाठ झोपेत होते. हा रिएक्टर कोसळल्यामुळे महिलेचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. याशिवाय तिच्या दुसऱ्या पायालाही मार लागला आहे.