प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला इमारतीवरून ढकलले
पोलीस महानगर नेटवर्क
कराड – कराड लगतच्या मलकापूर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका युवतीला इमारतीवरून ढकलून देऊन तिचा खून करण्यात आला आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले असून संबंधित प्रियकरास कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. आरूषी सिंग ( वय २१, रा.झुरण छपरा रोड नं- ३, मुजफ्फरनगर एमआयटी, बिहार ) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर ध्रुव राजेशकुमार छिक्कारा ( वय २१, रा.घर नंबर ६८४, गल्ली नं- १, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत, हरियाणा ) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिप्ती सिंग (वय ४८, रा. झुरण छपरा रोड नंबर ३, मुजफ्फरनगर एमआयटी,बिहार) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ध्रुव छिक्कारा याने आरूषीला मलकापूर येथील तो राहात असलेल्या इमारतीमध्ये बोलावले. येथे आल्यावर त्यांच्यात वाद झाला. तिचे दुसऱ्या मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याने तिला इमारतीवरून ढकलून दिले. यामध्ये आरूषीचा मृत्यू झाला तसेच यावेळी ध्रुवही पडल्याने जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करून पोलिसांनी गुरूवारी त्याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल , पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील हे तपास करीत आहेत.