धक्कादायक ! पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.शुक्रवारी सकाळी मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. तर इमारतीच्या आवारात ५८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला जात आहे. गोरेगाव पोलिसांनी सांगितले की, किशोर पेडणेकर असे मृत पुरुषाचे नाव असून राजश्री पेडणेकर असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, तपासादरम्यान दोघे पती-पत्नी असल्याचे निष्पन्न झाले असून किशोरने आधी पत्नी राजश्रीचा गळा आवळून तिचा खून केला आणि नंतर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. राजश्री पेडणेकर या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होत्या.
आत्महत्या करण्यापूर्वी पतीने नातेवाईकांना मेसेज करून आपले खाते कोणत्या बँकेत आहे, त्याची मालमत्ता कुठे आहे याची माहिती दिली होती. त्याचबरोबर त्यांच्या दिल्लीत राहणाऱ्या मुलासाठी विमानाचे तिकीटही पाठवले होते आणि रात्री ९ वाजेपर्यंत परत बोलवण्यात आले होते. पोलिस सध्या खून आणि आत्महत्येमागील कारण शोधत आहेत. गोरेगाव येथील एका गृहनिर्माण संस्थेत शुक्रवारी पन्नाशीतील जोडपे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. किशोर पेडणेकर या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, तर पत्नी राजश्री पेडणेकर हिचा खून झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरचा मृतदेह शुक्रवारी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आढळून आला. त्यांनी कोणता विषारी पदार्थ प्राशन केला होता का नाही हे फॉरेन्सिक चाचण्यांमधून स्पष्ट होईल. पोलिसांनी मृत जोडप्याच्या ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहेत.