ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; संभाजीराजे छत्रपतींवर केलेलं विधान भोवलं
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हल्लाची जबाबदारी स्वराज संघटनेने घेतली आहे. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी हा हल्ला आम्हीच केला असल्याचे सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण तापले असून गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांच्या चारचाकी गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. मात्र हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर ते फरार झाले. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्लाबोल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेने जितेंद्र आव्हाड यांना आधीच इशारा दिला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती म्हणणे सोडून द्यावे. त्यांचे रक्त तपासण्याची गरज असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत स्वराज्य संघटनेच्या वतीने आव्हाड यांना इशारा देण्यात आला होता. त्या नंतर आता त्यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला तसेच या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटना घेत असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती – जितेंद्र आव्हाड
मी घराकडे जात असताना गाडीवर दगड पडल्याचा आवाज आला. गाडी थांबवायला सांगितली, त्यानंतर हा हल्ला झालाय. संभाजी राजेंची चूक होती. विशाळगडावर जे काही झालं, ते त्यांच्या आडून झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या विसंगत त्यांची भूमिका होती. हे मी आज देखील सांगत आहे. राजर्षी शाहू महाराजांचं रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारांचं रक्त होतं. त्यांचं भांडण लावणारं रक्त नव्हतं. शाहू महाराजांचा विचार एक टक्का देखील संभाजीराजेंमध्ये नाही, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.