धक्कादायक! संशयातून प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून फेकून हत्या, कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा 

Spread the love

धक्कादायक! संशयातून प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून फेकून हत्या, कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा 

योगेश पांडे / वार्ताहर 

कराड – प्रेमासाठी वाट्टेल ते..! प्रेमात माणूस काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. दोघ एकमेकांवर प्रेम करत असतील तर ते एकमेकांसाठी काहीही करू शकतात, कितीही कष्ट उपसू शकतात. पण याच प्रेमात जर संशयाचा शिरकाव झाला, संशयाचं भूत डोक्यावर बसलं तर मात्र कठीण होतं. संशयात माणूस असं काही करून बसतो की त्यामुळे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक खळबळजनक घटना कराडमध्ये घडली आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत एका इसमाने त्याच्या प्रेयसीला इमारतीवरून खाली ढकलून दिलं आणि त्यामध्ये दुर्दैवाने त्या तरूणीचा मृत्यू झाला. कराडच्या मलकापूर येथील घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून शहरात खळबळ माजली आहे. आरुषी सिंग असे मृत तरूणीचे नाव असून ध्रुव छिक्कार असे आरोपी तरूणाचे नाव आहे. कराड शहर पोलिस ठाण्यात ध्रृवविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरूषी ही कराडमधील कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिचे व ध्रुव याचे दिल्लीत शिकताना, आधीपासूनच प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी कराडच्या कॉलेजमध्ये एकत्रच प्रवेश घेतला होता. ध्रुव हा कॉलेजजवळच्या एका इमारतीत रहायचा. बुधवारी त्याने आरुषीला घरी बोलावले होते. तिचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याच विषयावरून त्याने आरूषीला घरी आल्यावर जाब विचारला. त्यांच्यातील वाद वाढला आणि त्याच भरात ध्रुवने आरूषीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. गंभीर जखमी झालेल्या आरूषीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान ध्रुवही जखमी झाल्याचे समजते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्याला अटक झाली नाही. कराड शहर पोलिस ठाण्यात ध्रृवविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon