बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा! खोटी तक्रार देऊन खंडणी, प्रमोद जाधव याच्याविरोधात माळेगाव मध्ये गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बारामती – बारामतीतील माळेगाव येथे ग्राहक संरक्षण समितीचा सदस्य प्रमोद मानसिंग जाधव यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाची खोटी फिर्याद देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम २२ (१) (३) या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुपे गाव शेजारील दंडवाडी येथील फिर्यादीने फिर्याद दिली असून त्यावरून माळेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना ३ मे २०२४ ते ३१ जुलै २०२४ दरम्यान एस. एस. एम. हायस्कूल माळेगाव येथील मधुरा रेसिडेन्सीच्या ऑफिसमध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान घडली असे फिर्यादीने नमूद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या नातेवाईकासोबत फिर्यादीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार लिहून घेऊन पैसे उकळण्याच्या उद्देशाने प्रमोद जाधव याने नातेवाईकाच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना काहीही माहिती न होता अर्ज लिहून घेतला व त्याचा मोबाईलवर व्हिडिओ तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात फिर्यादीला बोलावून घेतले. तेथे खोटा तक्रारी अर्ज व व्हिडिओ दाखवून चार लाख रुपये मागितले. वेळोवेळी धमक्या देऊन २५ हजार रुपयांची खंडणी घेतली तसेच फिर्यादीची बदनामी केली, या कारणावरून फिर्यादीने तक्रार दिली असून माळेगाव पोलिसांनी सदर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास फौजदार खटावकर करत आहेत.