शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर रिसॉर्टवर बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – ठाण्याचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचा विरारच्या अर्नाळा येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका टोळक्याने मारहाण केल्यानंतर मिलिंद मोरे यांना अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. एका रिसॉर्टच्या बाहेरच हा प्रकार घडला. त्यामुळे या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर महसूल विभाग आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या दोन्ही विभागाने या रिसॉर्टवर बुलडोझर फिरवून तोडक कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आणि त्यांचे कुटुंबीय अर्नाळा येथील सेव्हन सी रिसॉर्टवर आले होते. रिसॉर्टमधून बाहेर पडताना एका रिक्षावाल्याशी त्यांची बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. काही टोळक्यांनी मिळून मिलिंद मोरे यांना जबरी मारहाण केली. ही मारहाण सुरू असतानाच मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर आज महसूल विभाग आणि पालिका प्रशासन खडबडून जागी झाले आहे. या दोन्ही विभागाने आज सेवन सी रिसॉर्ट अनाधिकृत असल्याने त्यावर तोडक कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनी या घटनेची दखल घेतली. त्यामुळेच प्रशासनाला जाग आली. वसई-विरार समुद्र किनाऱ्याजवळ हे अनधिकृत रिसॉर्ट आहे. त्यावर कारवाई झाली आहे. पण इतरही अनेक रिसॉर्ट असून ते अनधिकृत आहेत. त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी केली आहे. मिलिंद मोरे हे कुटुंबासह रविवारी ठाण्याहून अर्नाळाला आले होते. मोरे हे कुटुंबासोबत पिकनिकसाठी आले होते. यावेळी ते सेव्हन सी रिसॉर्टमध्ये उतरले होते. दिवसभर पिकनिक केल्यानंतर संध्याकाळी रिसॉर्टमधून बाहेर आल्यावर रिसॉर्टसमोरील एका रिक्षाचा त्यांना धक्का लागला. त्यानंतर रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरून त्यांची रिक्षा चालकासोबत वादावादी झाली. त्यानंतर या रिक्षाचालकाने गावातून काही लोकांना बोलावलं आणि या १० ते १५ जणांनी मिलिंद मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असतानाच मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्याच्या कलमान्वये अर्नाळा पोलीस ठाण्यात ७ ते ८ महिला आणि ८ ते १० अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.