एनडीएच्या प्रेशर पॉलिटिक्सला बळी पडू शकतात अनिल देशमुख?

Spread the love

एनडीएच्या प्रेशर पॉलिटिक्सला बळी पडू शकतात अनिल देशमुख?

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर दबावतंत्र,अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी विविध दावे केले जात आहेत. याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी एक मोठा दावा केला आहे. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा, असा दबाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली होती. यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार या चार नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एक निरोप जातो. त्यात त्यांना सांगितलं जातं की आम्ही तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवलेले आहेत. यावर सही करुन द्या. तर तुम्ही ईडीच्या जेलमधून वाचाल. अनिल देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आलेले प्रतिज्ञापत्रात १)उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचा मला आदेश दिला.२) उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला.३)अनिल परब यांचे गैरव्यवहार आणि ४)अजित पवारांनी मला आदेश दिला की गुटखा व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला तुम्ही इतके कोटी गोळा करा.

या चार प्रतिज्ञापत्रकावर सही करुन दिलात तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही. अनिल देशमुखांनी याबद्दल विचार केला आणि हे करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा निरोप देण्यात आला की अजित पवारांच्या प्रतिज्ञापत्रकावर सही करु नका. इतर तीन प्रतिज्ञापत्रकावर सही करा. अनिल देशमुखांनी याबद्दल प्रचंड विचार केला. मी जर सही केली तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तिघेही जेलमध्ये जातील. हा सर्व विचार केल्यानंतर अनिल देशमुखांनी सही केली नाही आणि स्वत: १३ महिने जेलमध्ये राहिले. त्यामुळेच मी अनिल देशमुखांचे कौतुक करतो. कारण याला खरा मर्दपणा म्हणतात.

यानंतर काही महिन्यांनी कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली. मी आयुष्यभर जेलमध्ये राहायला तयार आहे. पण मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही, असे अनिल देशमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं, असेही श्याम मानव यांनी म्हटले. दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon