रिक्षाचालकांनी भाडं नाकारल्यास होणार कारवाई! प्रवाशांसाठी आरटीओचे हेल्पलाइन नंबर जारी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अनेकदा खूप वेळ थांबूनही डोळ्यांसमोरून रिक्षा जातात, मात्र एकही रिक्षाचालक भाडं घेत नाही. याविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार करू शकता. रिक्षाचालकानं भाडं नाकारलं, जादा भाडं घेतलं किंवा प्रवाशांसोबत गैरवर्तन केलं, तर त्या रिक्षाचालकावर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे याबाबत प्रवाशांनी सतर्क व्हावं. रिक्षाचा प्रवास सोयीस्कर असतो. त्यामुळे शेकडो प्रवासी त्याला प्राधान्य देतात. मात्र रिक्षाचालकांनी भाडं नाकारण्याचं प्रमाण शहरी भागात मोठं असतं. अनेक रिक्षाचालक तर जवळच्या अंतरावरचं भाडंही नाकारतात किंवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अशा रिक्षाचालकांवर कुठे तक्रार करावी याबाबत प्रवाशांना पुरेशी माहिती नसते. यावर आता आरटीओ ने उपाय शोधला आहे. रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांना सहज तक्रार करता यावी यासाठी एक व्हाट्सएप्प हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. तसंच प्रवासी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊनही रिक्षाचालकांविरोधात तक्रार करू शकतात.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकाचा फोटो किंवा व्हिडीओ प्रवासी ८२७५३-३०१०१ या व्हॉट्सऍप हेल्पलाइन क्रमांकावर पाठवू शकतात. त्यानंतर आरटीओ चे अधिकारी संबंधित रिक्षाचालक आणि प्रवासी दोघांचीही बाजू ऐकून घेतील आणि पुरावे पडताळूनच रिक्षाचालकावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे रिक्षाचालकांवरही अन्याय होणार नाही.या कायद्यानुसार, कोणत्याही रिक्षाचालकानं मीटरप्रमाणे भाडं घेतलं नाही, तर त्याला शिक्षा होऊ शकते. शिवाय भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकाला दंड भरावा लागू शकतो.