शिर्डीला पायी निघालेल्या भाविकांचा वाटेत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर दोन भक्त जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त मोहणे टिटवाळा परिसरातून शिर्डीला निघालेल्या साई पालखीतील भक्तांना रात्री साडेआठच्या सुमारास घोटी सिन्नर दरम्यान भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात कवी पाटील आणि भावेश पाटील या दोन साई भक्तांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून एका भक्ताला किरकोळ दुखापत झाल्याची माहितीआहे. या पायी दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कल्याण परिसरातील भक्तांचा दुर्दैवी अपघातात जीव गमवावा लागल्याने हळहळ पसरली आहे. मोहने टिटवाळा परिसरातील साई आश्रय सेवा मंडळ दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त टिटवाळा ते शिर्डी पायी पालखीचे आयोजन करते. मंडळाचे हे २२ वे वर्ष असून यंदा देखील १३ जुलै रोजी मोहने टिटवाळा परिसरातून २०० साई भक्त शिर्डीच्या दिशेने निघाले होते. मंगळवारी १६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साईंची पालखी घोटी सिन्नर मार्गावरून जात असताना या पालखीत चालणाऱ्या चार भक्तांना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात कवी आणि भावेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखीन दोन भक्त जखमी झाले आहेत.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पळून गेला. त्यानंतर दिंडीतील इतर भक्तांनी तातडीने जखमींना उपचारासाठी घोटी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, तिथे डॉक्टरांनी कवी आणि भावेश यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच मोहने टिटवाळा परिसरातील जखमी आणि मृतांचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. तर, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.