पुण्यात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले; उपचाराचा खर्च देतो म्हणत हात झटकले

Spread the love

पुण्यात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले; उपचाराचा खर्च देतो म्हणत हात झटकले

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील अपघातांची मालिका काही गेल्या संपता संपत नाही. कधी बड्या बापांची पोरं सर्वसामान्यांना दारुच्या नशेत उडवतात. तर, कधी प्रशासकीय खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यातही आपल्या खुर्चीची हवा दिसून येते. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले आहे. वाहतूक व्यवस्था आणि मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, एका आरटीओ अधिकाऱ्यानेच दुचाकीला धडक देऊन केलल्या अपघातात अद्यापही कारवाई न झाल्यानंतर अपघातातील जखमींकडून संताप व्यक्त होत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली होती. वरळीतील हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असतानाच, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोरा आला आहे. कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवारी ३ जुलै रोजी हा अपघात घडला असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संभाजी गावडे असं प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव असून निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

विशेष बाब म्हणजे संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवून, अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. मात्र , दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, दोन्ही रुग्णांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसापासुन रुग्णालयातच खितपत पडावे लागल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ज्या दिवशी काही रस्ते बंद होते त्याच दिवशी हा अपघात घडल्याची माहिती आहे. संबंधित आर.टी.ओ. आधिकारी हे उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. आरटीओ अधिकारी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीला या गाडीने जोरात धडक दिली होती. त्यामध्ये, निखिल पवार व विकास राठोड हे दोघेही जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon