महिला पोलिसाला मैत्रिणीनेच घातला गंडा; लाखों रुपये उकळणाऱ्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीसालाच तीच्या मैत्रिणीने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. मैत्रिणीच्या आईच्या आजारपणात व आर्थिक अडचणीत केलेली मदत परत मागितल्यानंतर ती देण्यास टाळाटाळ करत एका महिला पोलिसाच्या मैत्रिणीने तिला दोन लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित महिला पोलीसने भोईवाडा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईच्या कळंबोली येथील रहिवासी असलेली ३७ वर्षीय तक्रारदार महिला मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. २०२१ मध्ये एका ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी महिला पोलीसची ओळख झाली. पुढे त्यांच्यात कौटुंबिक मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले.
दरम्यान, कोरोना काळात त्या मैत्रिणीने घरोघरी जाऊन सुविधा पुरविणे, ऑनलाइन ऑर्डर मिळवून ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरू ठेवला होता; मात्र नंतर ऑर्डर मिळविणे आणि सेवा पुरविणे कठीण असल्याने तिची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आई एका दुर्धर आजाराने ग्रासली आहे, असे सांगत तिने महिला पोलिसाकडे आर्थिक मदतीची विनंती केली तसेच ब्युटीपार्लरचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी तिने महिला पोलिसाकडून पैसे घेतले. महिला पोलिसाने तिचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आठ दिवसांच्या मुदतीत परत करण्याच्या बोलीवर दिले होते. हे मंगळसूत्र तिने वडाळा येथील एका सराफाकडे तारण ठेऊन त्यावर दीड लाख रुपये घेतले तसेच महिला पोलिसाच्या क्रेडिट कार्डवरून तिने ९० हजारांची खरेदी केली. एकूण रक्कम २ लाख ४० हजार रुपये घेतले. मैत्रिणीचे सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर महिला पोलिसाने तिच्याकडे दिलेली रक्कम परत मागितली असता ती वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करू लागली. फोन घेणेही बंद केल्याने महिला पोलिसाने शेवटी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.