मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेधार्थ आज विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
योगेश पांडे / वार्ताहर
पंढरपूर – विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील कर्मचारी गुरूवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. काम बंद आंदोलनामुळे भाविकांचे कोणतेही हाल होणार नसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. विठ्ठल मंदिरातील नित्योपचार विभागातील कर्मचारी वगळता सर्व विभागातील कर्मचारी गुरुवारी काम बंद आंदोलन करणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने शशिकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांची बुधवारी एक बैठक पार पडली. त्या बैठकीत मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला.