येरवडा बालसुधारगृहात राडा, मुलाच्या डोक्यावर टाईल्सने हल्ला; येरवडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले. त्यावेळी एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात टाइल मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी टाइल मारणाऱ्या मुलाला पकडले.
बालसुधारगृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या मुलाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बालसुधारगृहातील केअरटेकर महेश चंद्रकांत जाधव – ३७ यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देसाई या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.