धक्कदायक! वसई रेल्वे स्थानक परिसरात तरुणीचा विनयभंग; नालासोपारातून आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – रात्री उशीरा कामावरून परतणार्या (३२) वर्षीय तरुणीचा वसई रेल्वे स्थानक परिसरात विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा जलद तपास करून (२४) तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. वसई रोड रेल्वे स्थानक हे वर्दळीचे रेल्वे स्थानक असून हा परिसर महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत महिला रेल्वेतून प्रवास करत असतात. मात्र रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका तरुणीचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी सनदी लेखापाल असून वसईच्या अंबाडी रोड परिसरात राहते. हा परिसर जवळ असल्याने ती चालत घरी जाते.
शनिवारी रात्री ती नेहमीप्रमाणे रात्री उशीरा वसई रोड स्थानकात उतरली. रात्री दीडच्या सुमारास तुंगारेश्वर गल्लीतून ती चालत जात असताना एका इसमाने तिला अडवले. तिचे तोंड दाबून तिला खाली पाडून तिला विनयभंग केला. त्यानंतर या तरुणीचा महागडा फोन घेऊन पळ काढला. खाली पडल्याने तिला दुखापत झाली होती. तिच्यावर नवघरच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळताच विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. नालासोपारा येथून संदीप खोत (३५) या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर मुंबईत फसणुकीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.