विरार रेल्वे स्टेशनवर पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा; वसईची पुनरावृत्ती
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – काही दिवसांपूर्वी वसईत एका प्रियकराने लोखंडी पान्याने आपल्या प्रेयसीला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. पण नशीब बलवत्तर असल्याने या घटनेतील महिला सुदैवाने बचावली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. शिव शर्मा आणि वीरशिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांमधील कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरशिला शर्मा ही कामावर जात असताना शिव शर्माने तिच्यावर हल्ला चढवला. विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकला लागून असलेल्या पादचारी पुलावर हा प्रकार घडला. वीरशिला शर्मा बुधवारी सकाळी साडेसात वाजता कामाला निघाली होती. त्यावेळी तिचा नवरा शिव शर्मा याने तिला विरारच्या रेल्वे ब्रीजवर एकटे गाठून तिच्यावर हल्ला केला. शिव शर्मा याने वीरशिला हिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर ओढणीने तिचा गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. परंतु, वीरशिला हिने चाकूचे पाते हाताने धरुन ठेवले. यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला. मात्र, चाकू हल्ला रोखताना तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या गळ्यावरही चाकूचा एक वार झाला आहे.
वीरशिला शर्मा हिच्यावर सध्या विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा पती शिव शर्माला ताब्यात घेतले आहे. शिव आणि वीरशिला यांच्यात वाद होता. कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी काल हे दोघेही विरार पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी त्यांना समजावून सोडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.