अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात बार मालक आक्रमक; ठिय्या आंदोलन
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला – पुण्यात वाढती गुन्हेगारी, अपघातांचे सत्र, आणि नव्याने पुन्हा चर्चेत आलेले ड्रग्ज प्रकरण राज्यासह देशात गाजत आहे. अशातच पुण्यातील एफ सी रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. अशातच या प्रकरणामुळे राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून इतर शहरात देखील पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत.
अकोला जिल्ह्यातील सर्व बार चालक मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक पवित्रा घेत अकोला शहरातील सर्व बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व बार मालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना हेतुपुरस्सर कारवाई सुरू केल्याचा आरोप बार मालकांनी केला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणाविरोधात अकोला शहरातील सर्व बार बंद असणार आहेत, तर बारमालकांनी बारच्या चाव्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केल्या आहेत. यापुढे उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत, असा पवित्रा मालकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळ गाठत बार मालकांची समजूत काढली. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात बार मालकांनी आपला रोष व्यक्त करत प्रशासनाने या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणीही आकोल्यातील बार मालक असोसिएशनने केली आहे.