मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच; आता घटक पक्षांचीही उडी

Spread the love

मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच; आता घटक पक्षांचीही उडी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची १० जागांची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली. ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील दोन तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा वेळी महाविकास आघाडीने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवाय सत्तेत आपण पुन्ह येवू असा विश्वासही त्यांना वाटू लागला आहे. अशावेळी मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटांने जास्तीत जास्त जागा पदरात कशा पडतील यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना त्यात आता घटक पक्षांनीही उडी घेतली आहे. समाजवादी पक्षाने आपल्याला १० जागा मिळाल्याच पाहीजे अशी मागणी केली आहे. पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ही मागणी केलीय. समाजवादी पक्षाचे दोन आमदार सध्या विधानसभेत आहेत. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नाही. पण मविआच्या उमेदवारांना विजयी करण्यात त्यांचा हातभार लागला आहे.लोकसभेला तडजोड केली पण विधानसभेला तडजोड करण्याच्या मानसिकतेत अबू आझमी नाहीत. विधानसभेच्या दहा जागा समाजवादी पक्षाला मिळाव्या असे ते म्हणाले. जर तसे झाले नाही तर आम्ही दिल्ली अखिलेश यादव यांची भेटी घेणार आहोत. अखिलेश आणि राहुल गांधी यांची सध्या चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या समोर शब्द टाकू असेही ते म्हणाले. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा दिल्ली दरबारी नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे जागा वाटपा बाबत अबू आझमी यांनी पक्षाची मागणी समोर ठेवली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणा वरून ही आझमी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय मविआने अजेंड्यावर घ्यावा असेही ते म्हणाले. हे आरक्षण मिळालेच पाहीजे असेही ते म्हणाले. जर या विषयाकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मविआमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्या यासाठी तीनही पक्ष कमालीचे आक्रमक झाले आहे. लोकसभेचा निकाल मविआसाठी चैतन्य निर्माण करणारा असाच आहे. कोणाला किती जागा मिळाव्यात याबाबतची प्राथमिक चर्चा मविआमध्ये झाली आहे. त्यानुसार एक फॉर्म्यूलाही समोर आला होता. त्यानुसार काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी १००जागा लढेल. तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८८ जागांवर लढेल. प्रत्येक जण आपल्या कोट्यातून घटक पक्षांना जागा सोडतील अशीही मविआमध्ये चर्चा झालेली आहे. प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच अंतिम जागा वाटप होईल असेही मविआच्या नेत्यांनी सांगितले आहे. मात्र जागा वाटपात नक्की तारेवरची कसरत करावी लागेल. त्यात वंचितची भूमीका काय असेल याबाबत उत्सुकता आहे. त्यांची एन्ट्री मवीआमध्ये झाल्यास जागा वाटप अजून किचकट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon