धक्कादायक ! पुण्यात ऑफिसमध्ये महिलेचे काढलेले अश्लील फोटो केले व्हायरल, गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सध्या पुणे वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत आले आहे. सांस्कृतिक व विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे, पण सध्या ही ओळख गुन्हेगारीकडे चालली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकारी महिलेचे अश्लील फोटो काढून ते महिलेच्या मुलीच्या व मुलाच्या व्हॉट्सअँपवर तसेच इतरांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन २०१९ ते २३ जून २०२४ या कालावधीत विमाननगर भागातील महिलेच्या ऑफिसमधील बेडरुम मध्ये घडला आहे.
याबाबत ५३ वर्षीय महिलेने रविवारी (दि.२३) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वेत रंजन पाठक (वय-४५ रा. निको गार्डन, विमाननगर) याच्यावर भा.द. वि. कलम ३५४, ३५४ (क), ५०६, आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी विमाननगर भागात एकाच कार्यालयात काम करतात. आरोपीने ऑफिसमधील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या नकळत त्यांचे न्यूड फोटो काढले. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवरुन ते फोटो फिर्यादी महिलेच्या मुलीच्या, मुलाच्या तसेच इतरांच्या व्हॉट्सअँपवर पाठून महिलेची बदनामी करुन विनयभंग केला. तसेच न्यूड फोटो २२६ देशात व्हायरल करण्याची धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.