भरमसाठ परताव्याच्या आमिषाने २६ लाख ५० हजारांची फसवणूक; वाकड पोलीसात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – राज्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशीच एक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, आयपीओमध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून २६ लाख ५० हजार रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार २६ मे ते ११ जून या कालावधीत रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.१८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जुही पटेल, नरेश कुमार जडेजा आणि इतर अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एमएसएफएल गुजरात येथील मूळ कंपनीचे बनावट ट्रेडमार्क, संचालकांची बनावट ओळख आणि कंपनीचे बनावट वेब अँप्लिकेशन तयार केले. त्या आधारे फिर्यादीस शेअर्सचे ब्लॉक ट्रेड व आयपीओमध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास तयार केले. गुंतवणुकीसाठी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरोपींनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्या गुंतवणुकीवर एकूण ६३ लाख ९० हजार रुपये परतावा मिळाला आहे, असे दाखवण्यात आले. त्यांना आणखी जास्त गुंतवणूक करा असे सांगितले. मात्र महिलेने त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम २६ लाख ५० हजार रुपये व त्यावरील परतावा मागितला असता आरोपींनी तो देण्यास नकार देत फसवणूक केली. तसेच कमिशनपोटी १२ लाख ७८ हजार आणखी पैशांची मागणी केली. या घटनेची वाकड पोलीस तपास करीत आहेत.