अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांच्या अडचणीत वाढ, सराफा व्यापाऱ्याकडून फसवणूक केल्याची तक्रार, कोर्टाने दिले तपासाचे आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) यांना सराफा व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांच्या तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा असेही कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे.
पृथ्वीराज कोठारी यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंद्रा दाम्पत्याने २०१४ मध्ये एक योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी एक योजना होती की अर्ज करताना त्यांना सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर गुंतवणूक योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने दिले जाणार होते. आरोपींनी केलेल्या दाव्याच्या आधारे, कोठारी यांनी २ एप्रिल २०१९ रोजी आपल्याला ५००० ग्रॅम २४ कॅरेट सोने दिले जाईल या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत ९० लाख ३८ हजार ६०० रुपये गुंतवले. मात्र, कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेले सोनं देण्यात आले नाही. तक्रारीत म्हटले की, आरोपींनी एक प्रकारे बोगस गुंतवणूक योजना आखून फसवणुकीचा कट आखला.
दरम्यान, राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर आहे.