बंदी असलेल्या पान मसाला आणि गुटखा जप्त; शांतीनगर पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – शहरातील शांतीनगर पोलिसांनी भारत कंपाऊंडमधील एका गाळ्यात छापा टाकून तब्बल ९लाख ३७ हजार ७६० रुपयांचा बंदी असलेला पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी नेहरूनगर येथील नवी बस्तीत राहणाऱ्या अरबाज शौकत अली सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत कंपाऊंड येथील अहमद इस्रायल सिद्दीकी यांच्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व गुटखा विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, विविध कंपन्यांचा बंदी असलेला पान मसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. ज्याचा बाजारभाव सुमारे ९, ३७, ७६० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अरबाज नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याचा पुढील तपास शांतिनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत.