बालविवाह कायद्याची ऐशी की तैशी ! १४ व्या वर्षी लग्न, १६ व्या बाळंतपण
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – राज्यातील खेड्या-पाड्यात किंवा ग्रामीण आदिवासी भागात अल्पवयीन मुला- मुलींचे विवाह लावले जातात.पण नाशिक सारख्या शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह होऊन ती बाळंतीण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात १६ वर्षीय मुलाचा विवाह २ वर्षांपूर्वी त्याच्याच वयाच्या मुलीशी लावला होता. दोघेही अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील मुलाच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावले. मधल्या काळात दोघे नाशिकमध्ये मजुरी काम करत होते.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ती बाळंतपणासाठी नाशिकरोडच्या एका सरकारी रुग्णालयात दाखल झाली. तिने ६ महिन्याच्या मुलाला जन्म दिला. दुर्दैवाने हे मुल मृत जन्माला आले. हा बालविवाह असल्याचे समजताच हॉस्पिटलने याबाबत पोलिसांना कळवले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या आई- वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, घटना मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात घडल्याने सदर गुन्हा तिथे वर्ग करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.