४ जूनच्या निकालानंतर कपिल पाटील यांची दादागिरी व हत्याकांड प्रकरणे पुराव्यानिशी बाहेर काढू – बाळ्या मामा

Spread the love

४ जूनच्या निकालानंतर कपिल पाटील यांची दादागिरी व हत्याकांड प्रकरणे पुराव्यानिशी बाहेर काढू – बाळ्या मामा

मनोज म्हात्रे हत्याकांडात कपिल पाटलांचा हात,बाळ्या मामांचा केंद्रीय मंत्रीवर गंभीर आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी संपल्यानंतरही राजकीय नेते एकमेकांविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर काही नेतेमंडळी विविध ठिकाणी पर्यटन दौऱ्यावर गेले आहेत. तर, काही नेते आपल्या मतदारसंघात फिरुन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ४ जूनच्या निकालाची प्रशासनाकडून तयारी सुरू असून उमेदवार व कार्यकर्त्यांनाही निकालाची उत्सुकता आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगल्याचं दिसून आलं. या लढतीतून केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे आमनेसामने आले होते. आता, उमेदवार बाळ्यामामा यांनी कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय मंत्री कपिल पाटील व त्यांचा पुतण्या सुमित पाटील यांचाच हात होता, या प्रकरणात अटक असलेल्या आरोपीचा हत्याकांडानंतर सुमित पाटील यांच्याशी सतत मोबाईलवर संपर्क सुरु होता. मात्र, केवळ राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत कपिल पाटील बचावले आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी केला आहे. शहरातील पद्मानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान व मदत केल्याचा राग मनात धरून पद्मानगर येथील श्रीनिवास नडीगोट्टू उर्फ स्वामी यास भाजप कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केली होती. जखमी स्वामी यास उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असून गुरुवारी सकाळी बाळ्या मामा यांनी जखमी स्वामी यांची भेट घेतली. यावेळी कपिल पाटील व त्यांच्या कार्यकर्त्याचे हे कृत्य निषेधार्थ असून राजकारणात अशा प्रकारे चिडून जाणे व कार्यकर्त्याना मारहाण करणे चुकीचे असल्याचे बाळ्यामामांनी म्हटले.

कपिल पाटील यांनी त्यांची दादागिरी थांबवावी. याआधी देखील त्यांनी माजी आमदार योगेश पाटील यांच्या घरावर हल्ला केला होता. मनोज म्हात्रे प्रकरणात देखील त्याचा हात होता, अनेक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यात त्यांचाच हात असून या सर्व प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करत आहेत. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ४ जूनच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर कपिल पाटील यांच्या दादागिरीची, हत्याकांडाची प्रकरणे आपण स्वतः पुराव्यानिशी बाहेर काढू, असा इशाराच बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांना यावेळी दिला. तसेच, पिल पाटलांनी त्यांची दादागिरी थांबवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon