गुजरातच्या अहमदाबादमध्ये इस्लामिक स्टेटच्या ४ दहशतवाद्यांना एटीएसने विमानतळावरून केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
अहमदाबाद – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान उत्सव सुरू असतानाच महाराष्ट्राजवळच्या राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये इस्लामिक स्टेटच्या ४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, हे चारही दहशतवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित असून त्यांचे श्रीलंकन कनेक्शनही समोर आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. १ जून रोजी गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदान होणार आहे. तर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
चारही दहशतवाद्यांना एटीएसने पकडल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी विमानतळावर येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती. त्यानुसार प्लॅन करून कारवाई करण्यात आली आहे. एटीएसकडून ४ दहशतवाद्यांची चौकशी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सध्या अलर्ट मोड आहे. पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.