बचत गटाचे हप्ते वेळेत न भरल्याने दोघा बंधूवर काठी व कोयत्याने हल्ला; फायनान्स कर्मचाऱ्यासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे फायनान्स बचत गटाच्या कर्जाचा हप्ता वेळेत का भरला नाही असे म्हणून दोघा भावांना काठीने व कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी नरेश साखरे, दिपक साखरे, तेजस साखरे, संदिप साखरे, रोहिदास शिंदे, किरण साखरे तसेच मंगळवेढ्यातील जना फायनान्समधील दोन अज्ञात कर्मचारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी रतन चंदनशिवे (वय ५५, रा.उचेठाण) हे दि.२० एप्रिल रोजी सकाळी १०.०० च्या दरम्यान व त्यांचा जखमी भाऊ किसन उर्फ श्रीरंग चंदनशिवे असे दोघे घरासमोरील वांग्याच्या पिकात खुरपण्याचे काम करीत असताना वरील आरोपींनी येवून मंगळवेढा येथील जना फायनान्स बचत गटाच्या कर्जाचे हप्ते वेळेत का भरला नाही असे म्हणून शिवीगाळ करू लागले. आरोपींनी काठी घेवून फिर्यादी व फिर्यादीच्या भावास डोक्यात, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर, पाठीत मारून जखमी केले.
तसेच घरासमोर पडलेला ऊस तोडण्याचा कोयता घेवून आरोपींनी भावाच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून गंभीर जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी राहणारे राहुल खांडेकर यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आरोपींची जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान जखमीवर शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात असून बरे झाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक पोलिस हवालदार खंडागळे हे करीत आहेत. दरम्यान, मंगळवेढ्याच्या शहर व ग्रामीण भागात फायनान्सवाल्यांनी गोरगरीबांना कर्जे देऊन त्याची आठवड्याला सक्तीने वसुली केली जात असल्याने गोरगरीब मजूर कर्मचारी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आले आहेत. या फायनान्स कंपन्यांची टक्केवारी जास्त असूनही गोरगरीब लोक नाईलाजाने कर्जाने पैसे घेवून लोकांची देणी भागवत आहेत. मात्र वाढत्या व्याजामुळे गोरगरीबांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता ते आर्थिकदृष्टया चक्रव्युहात सापडत असल्याचे चित्र आहे.
बळजबरीने व सक्तीने वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करून गोरगरीबांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी त्रस्त कर्जदार करीत आहेत.