नाशिकमध्ये १२ किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने एका इसमाला अटक करून त्याच्याकडून १.४९ लाख रुपये किमतीचा ११ किलो गांजा जप्त केला. यश उर्फ बज्या पाटील याने अंबड लिंक रोडलगत एका रो-हाऊसमध्ये गांजा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी एक पथक तयार करून घरावर छापा टाकला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने फ्लोरा टाऊनमधील पदमश्री रो हाऊसमधील १२ क्रमांकांच्या रोहाऊसवर छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईत पोलिसांनी घरझडती घेतली असता, त्यावेळी घरामध्ये ११ किलो ६५० ग्रॅम वजनाचा गांजा पथकाच्या हाती लागला. संशयित बाज्या याने गांजा साठा करून ग्राहकांना चोरीछुप्या विक्री करीत असल्याची कबुली दिली. मोबाईल व गांजा असा १ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक श्रीवंत, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, अप्पा पानवळ, समाधान पवार यांच्या पथकाने केली.