लोनचं ‘लोण’ पसरलं मुंबईत, तरूणी सेक्स्टॉर्शनच्या बळी.
अश्लिल फोटो, व्हिडिओ मित्र-नातेवाइकांना पाठवले.मुंबई पोलिसांनी सायबर कायद्याद्वारे गुन्हा नोंद करून तपासाला केली सुरुवात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत सायबर गुन्ह्यांचा विळखा घट्ट होत आहे. लोन अँपद्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत. मुंबईसह देशातील बहुतांश व्यक्ती याआधी सेक्स्टॉर्शनचे बळी ठरले आहेत. सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून केलेल्या बदनामीमुळे काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. आता या प्रकाराला तरुणी देखील बळी पडू लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत लोन अँपद्वारे फसवणूक आणि बदनामीच्या प्रकारात वाढ होत आहे. मागील दोन दिवसांत मुंबईच्या ओशिवारा पवई आणि गिरगाव चीरा बाजार येथील पंचवीस आणि तीस या वयोगटातील तीन तरुणी सेक्स्टॉर्शनच्या बळी ठरल्या आहेत. पैशांची गरज असल्याने या तरुणींनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोन एपच्या लिंक करून त्यात स्वत:ची वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर या तरुणींना कर्ज मिळालं. कालांतराने या तरुणींनी कर्जाची परतफेड केली. मात्र कर्ज परतफेड करुनही वसुलीसाठी कंपनीकडून तगादा सुरु झाला. तरुणींनी अधिक पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर या तरुणींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फिंग करून त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांना पाठवून कंपनीने ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणींनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी सायबर कायद्याद्वारे गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.