एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यास शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून चार आठवड्यांची मुदत वाढ.
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठीची मुदत सुप्रीम कोर्टाने वाढवून दिली आहे. सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे हजर होण्यासाठी चार आठवड्यांची मुदत वाढ करून दिली आहे. त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला याप्रकरणात भूमिका मांडण्याचे देखील आदेश दिले आहेत. लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यात मुंबई पोलिसांसमोर सरेंडर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. याप्रकरणावर आज सुनावणी झाली. तर सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी मुदत वाढवली आहे. तीन आठवड्याचा कालावधी चार आवठडे केला आहे. म्हणजे त्यांना पोलिसांसमोर सरेंडर होण्यासाठी एक आठवड्याची मुदतवाढ मिळाली आहे.
प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर आता चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारला याप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्यपीठाने आज सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला आहे. दरम्यान, लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सेशन कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पण मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाचा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्याचा २००६ मध्ये बनावट एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला होता. लखनभैय्याविरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होतो. ११ नोव्हेंबर २००६ रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी वर्सोवा येथे त्याचा एन्काऊंटर झाला होता.