शेअर मार्केट गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची २७ लाखांची ऑनलाईन फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची तब्बल २७ लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फसवणूक झालेल्या महिलेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
१० जानेवारी रोजी ते २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी दरम्यान फिर्यादी महिला, (वय ४४), रा. रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम यांना दोन अनोळखी मोबाईलधारक इसमांनी इंस्टाग्रामवर शेअर्स मार्केटबाबत मेसेज करून त्यात लिंक पाठविली. त्यानंतर लिंकद्वारे फिर्यादी यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगितले. त्यात गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेची एकुण २७ लाख रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.